नवी दिल्ली : केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये जून महिन्यासाठीचे पैसे जमा केले आहेत. महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारने ५०० रुपये ट्रान्सफर केले आहेत. हे पैसे काढण्यासाठी सरकारने दिवसही निश्चित केला आहे. नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी करू नये, तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं, म्हणून हा नियम करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठीचा दिवस निश्चित करण्याचा नियम मे महिन्यापासून लागू झाला. या नियमानुसार ५ दिवस बँकेमधून ही रक्कम काढता येणार आहे. जनधन खात्याच्या शेवटच्या अंकानुसार पैसे काढण्याचा दिवस ठरवून देण्यात आला आहे. 


शेवटची संख्या ० किंवा १ असेल त्यांच्यासाठी ५ जून 


शेवटची संख्या २ आणि ३ असेल त्यांच्यासाठी ६ जून 


शेवटची संख्या ४ आणि ५ असेल त्यांच्यासाठी ८ जून 


शेवटची संख्या ६ आणि ७ असेल त्यांच्यासाठी ९ जून 


शेवटची संख्या ८ आणि ९ असेल त्यांच्यासाठी १० जून 


२० कोटी महिलांना लाभ 


सरकारने आत्तापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून २०.६३ कोटी महिलांना जनधन खात्याच्या माध्यमातून दोन हफ्त्यांमध्ये २०,३४४ कोटी रुपये दिले आहेत. जूनमधली ही रक्कम तिसरी आहे. जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठी बँकेत जायचं असेल तर बँकेत जाण्याचा किंवा बँक मित्र या माध्यमातून पैसे घरी पाठवण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे, असं अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


बँकांकडून कडक नियम


बँकांकडून जनधनचे पैसे काढण्यासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात सरकारने खात्यात पैसे टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांची बँकेत गर्दी झाली होती. त्यामुळे खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकावरून पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला.


एटीएममधूनही पैसे काढता येणार


खातेदारक बँक मित्र किंवा सर्व्हिस सेंटरमधूनही पैसे काढू शकतात, असं इंडियन बँक असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे. तसंच एटीएममधूनही पैसे काढण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही, पण ११ मेनंतर कोणताही खाते क्रमांक असलेला व्यक्ती हे पैसे काढू शकतो.


बँकेबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन


नागरिकांनी बँकेबाहेर गर्दी करू नये, असं आवाहनही इंडियन बँक असोसिएशनकडून करण्यात आलं आहे. खाते क्रमांकाच्या शेवटच्या संख्येप्रमाणेच पैसे देण्यात येणार आहेत, असंही असोसिएशनने सांगितलं आहे.