मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बळावलेला कोरोना Corona  व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता सरकारकडून परदेशी नागरिकांच्या भारतात येण्यावर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपान या राष्ट्रांतून भारतात येण्यासाठीच्या नियमांवर काही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आणि सुधारित 'ट्रॅव्हल ऍडव्हायझरी'नुसार या देशातील पर्यटकांना आता पुन्हा एकदा नव्याने व्हिसासाठी आवेदन करावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधारित ऍडव्हायजरीनुसार 'इटली, इराण, जपान, दक्षिण कोरिया या देशातील नागरिकांना ३-३-२०२० किंवा त्यापूर्वी देण्यात आलेले नियमीत (स्टीकर)व्हिसा/ ई व्हिसा (जपान आणि दक्षिण कोरियामध्ये जाण्यासाठीचा व्हिसा) आणि ज्या व्यक्तींनी अद्यापही भारतात प्रवेश केलेला नाही, त्यांचा व्हिसा सद्यस्थिती पाहता रद्द करण्यात आला आहे. काही महत्त्वाच्या कारणांसाठी भारता येऊ पाहणाऱ्यांनी  व्हिसासाठी नवं आवेदन जवळच्या भारतीय दुतावासाकडे करावं.'


इतकंच नव्हे तर, china चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांना भेट देऊन आलेल्या किंवा १ फेब्रुवारीनंतरच्या काळात तेथे असणाऱ्यांच्या आणि भारतात येण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांच्या व्हिसावरही हे निर्बंध लादण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी, राजदूत, आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य किंवा या राष्ट्रांतील विमानसेवांमध्ये काम करणारे कर्मचारी यांना या निर्बंधांतून वगळण्यात आलं आहे. पण, त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासणीला सामोरं जावं लागणार आहे. 



कोणत्याही बेटावरुन आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या सहाय्याने भारतात येणाऱ्या प्रवाशांकडून एक स्वयंघोषित माहितीपत्र भरुन घेण्यात येत आहे. ज्यामध्ये वैयक्तीक माहितीचा तपशील (नाव, भारतातील पत्ता, दूरध्वनी क्रमांक) असेल. शिवाय यामध्ये प्रवासाचा तपशील लिहिणंही गरजेचं असणार आहे. ही माहिती आरोग्य अधिकारी आणि गरजेच्या ठिकाणी पुरवली जाणार आहे. 


वाचा : कोरोना व्हायरस : दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र


भारतीय प्रवाशांनीही सध्याच्या काळात चीन, इराण, कोरिया आणि इटली या देशांणध्ये गरज नसल्यास प्रवास करणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.