`सरस्वती नाही तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता` म्हणणारी सरकारी शिक्षिका निलंबित
School Teacher Suspended Compared Saraswati With Savitri Bai Phule: स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये या शिक्षेकेचं गावकऱ्यांबरोबर कडाक्याचं भांडण झालं. हे प्रकरण पाहात पाहात शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचलं.
School Teacher Suspended Compared Saraswati With Savitri Bai Phule: राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी बारां जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान एका शिक्षिकेला निलंबित केलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये या शिक्षिकेने सरस्वती मातेचा फोटो लावू दिला नव्हता. यानंतर गावकऱ्यांनी या शिक्षिकेलाविरोध केला आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. किशनगंज क्षेत्रातील एका शाळेमधील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एकूण 3 शिक्षकांवर कारवाई
शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आदेश आणि अहवालाच्या आधारावर हेमलता बैरवा यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा कार्यकारी अधिकारी पीयूष कुमार शर्मा यांनी तपासानंतर हेमलता बैरवा यांना निलंबित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरकारी शाळेतील शिक्षिका अकलिमा बेगम आणि डाबडिया शाळेतील शिक्षक हेमराज मेघवाल यांना प्रशासकीय कारणांसाठी एपीओ म्हणजे अवे फ्रॉम ऑफिस नोटीस दिली असून तिघांनाही थेट बिकानेरमधील मुख्यालयात बोलवण्यात आलं आहे.
नेमका घटनाक्रम आणि सावित्रीबाईंचा उल्लेख
लकडाई गावामधील उच्च प्राथमिक शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यामध्ये गावकरी आणि शाळेतील शिक्षकांमध्ये मोठा वाद झाला. हे प्रकरण एवढं वाढलं की शाळेतील शिक्षिकेने सरस्वती मातेचा फोटो लावण्यासही नकार दिला. काही शिक्षकांनाही या भूमिकेचा विरोध केला. मात्र या शिक्षेकेने कोणाच्याच विरोधाला न जुमानता सरस्वतीचा फोटो लावायचा नाही म्हणजे नाही अशी भूमिका घेतली. गावकऱ्यांनी सरस्वतीचा फोटो लावण्याचा आग्रह या शिक्षिकेकडे केला. त्यावर या शिक्षेकेने, 'सरस्वती विद्येची देवता नाही. विद्येची देवता तर सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळेच केवळ त्यांचा फोटो ठेवला आहे,' असं गावकऱ्यांना सांगितल्याचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. शिक्षिकेच्या या विधानाचा गावकऱ्यांनी कडकडून विरोध केला. संपूर्ण कार्यक्रम पार पाडला मात्र या शिक्षिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सरस्वती मातेचा फोटो स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लावण्यात आला नाही. मात्र हे प्रकरण येथे संपलं नाही.
थेट शिक्षण मंत्र्यांकडे गेलं प्रकरण
घडलेल्या प्रकारामुळे या शिक्षेकेने गावकऱ्यांचा रोष ओढावून घेतला. बराच वेळ वाद झाल्यानंतरही फोटो न ठेऊ देणाऱ्या या शिक्षिकेची चर्चा स्वातंत्र्यदिनानंतरही गावात सुरुच होती. अखेर गावाचे सरपंच तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रकरण थेट राज्याच्या शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचलं. शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणामधील सत्य समोर आलं पाहिजे असं त्यावेळेस म्हटलं होतं. त्यांनी या प्रकरणाचे आदेश दिले. या तपासामध्ये शिक्षिका दोषी आढळून आली. शिक्षिकेच्या विधानामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्याचं या प्रकरणाच्या तपास अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याने तिच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.