नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून ज्या मुद्द्यांवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधक मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या राफेल कराराबद्दल नियंत्रक व महालखा परीक्षकांचा (कॅग) अहवाल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. उद्या, गुरुवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे. शुक्रवारी, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री पियुष गोयल अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. त्यानंतर कॅगचा अहवाल लोकसभेत पटलावर ठेवला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी हा अहवाल संसदेत सादर करण्यात येणार असल्याचे समजल्यावर आता 'अब होगा दूध का दूध और पानी का पानी' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्योगपतींशी मैत्रीमुळेच नियम डावलून अनिल अंबानी यांच्या कंपनीकडे राफेलचे काम देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राफेलचा मुद्दा गाजला होता. यावर लोकसभेमध्ये चर्चाही झाली होती आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा लावून धरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात कॅगचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कॅगच्या अहवालात या प्रकरणावर काय टिप्पणी करण्यात आली आहे. त्यावर विरोधकांच्या मुद्द्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होईल. या सर्व पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राफेल प्रकरणी कॅगने दिलेला अहवाल संसदेत सादर केला जाईल. 


दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावे, यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी राज्यसभेतील गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.