बंद असलेली सरकारी कपंनी रतन टाटांच्या हाती; लवकरच पुन्हा होणार सुरु
जवळपास दोन वर्षांनी ही कंपनी उघडण्यास सज्ज झाली आहे
खासगीकरणाला विरोध होत असतानाही सरकारने आणखी एका मोठ्या कंपनीचे खासगीकरण केले आहे. यावेळी सरकारने एक मोठी कंपनी दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या हाती दिली आहे. दरम्यान, ही कंपनी तोट्यात चालली होती आणि ती दोन वर्षांपासून बंद आहे.
मात्र आता या कंपनीचे नशीब बदलण्याची शक्यता आहे. कारण जवळपास दोन वर्षांनी ही कंपनी उघडण्यास सज्ज झाली आहे.
दोन वर्षांपासून बंद असलेली निलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) ही सरकारी कंपनी रतन टाटांच्या हाती आली आहे. टाटा स्टीलचे (Tata Steel) व्यवस्थापकीय संचालक टीव्ही नरेंद्रन म्हणाले की, निलाचल स्टील प्लांट लवकरच सुरू करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे आता ही कंपनी आता लवकरच पुन्हा सुरु होणार आहे.
“आम्ही विद्यमान कर्मचार्यांसह काम करण्यास आणि जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यास तयार आहोत. आम्ही पुढील तीन महिन्यांत उत्पादन सुरू करण्याची आणि पुढील 12 महिन्यांत आमची क्षमता गाठण्याची अपेक्षा करतो, असेही व्यवस्थापकीय संचालक टीव्ही नरेंद्रन म्हणाले.
दरम्यान, टाटा स्टील एनआयएनएलची क्षमता 5 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळविण्यासाठीही पावले उचलणार आहे.
ओडिशामधील एनआयएनएलची जबाबदारी टाटा समूहाच्या एका कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. टाटा स्टीलच्या टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (TSLP) युनिटने जानेवारीमध्ये एनआयएनएलची 93.71 टक्के भागभांडवल विकत घेण्याची बोली जिंकली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड यांना मागे टाकत टाटाने हे यश मिळवले