नवी दिल्ली - असंघटित क्षेत्रासाठी वयाच्या साठीनंतर ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. त्याची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) सदस्यांनाही किमान ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. असंघटित क्षेत्राप्रमाणे संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही किमान ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन दिले जाण्यावर विचार केला जात आहे, असे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाचे सदस्य विरजेश उपाध्याय यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ३००० रुपयांचे किमान निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला जाईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे या संदर्भातील प्रस्ताव आधीपासून प्रलंबित आहे. त्यावर लवकर निर्णय घेतला जावा, अशी मागणी कामगार मंत्रालयाने केली आहे. सध्या संघटित क्षेत्रातील आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते. आता ते वाढवून ३००० रुपये केले जाईल.


भविष्य निर्वाह निधी लागू असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कंपनी वाट्यातील ८.३३ टक्के इतकी रक्कम पेन्शन फंडात जाते. सरकार या निधीमध्ये त्यांच्याकडून १.१६ टक्क्यांचे योगदान करीत असते. जर निवृत्तीवेतनाची रक्कम वाढवली, तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सक्रिय सदस्य वाढविण्यास मदत होईल.