नवी दिल्ली: लॉकडाऊन संपल्यानंतर देशातील उद्योगधंदे सुरु होतील तेव्हा केंद्र सरकार मजुरांना शहरात परतण्यासाठी मदत करेल, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्या बुधवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांसंदर्भात भाष्य केले. लॉकडाऊननंतरच्या काळात उद्योगधंदे कसे सुरु होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि उद्योगांनी बेरच प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, केंद्र सरकार लॉकडाऊनंतर मजुरांना पुन्हा शहारांमध्ये कसे आणायचे याची योजना आखत आहे. हे सगळे शक्य तितक्या चांगल्याप्रकारे पार कसे पार पाडता येईल, याचा विचार आम्ही करत असल्याचे सीतारामन यांनी म्हटले.



तसेच केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून गरिबांना थेट पैसे का देण्यात आले नाहीत, या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले. आर्थिक पॅकेज जाहीर करण्यापूर्वी आमच्याकडे बऱ्याच सूचना आल्या होत्या. बराच विचार केल्यानंतर देशातील उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, हे निश्चित झाले. आर्थिक पॅकेजमधील प्रोत्साहनपर योजनांमुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा प्रभाव कमी होईल. अनेकप्रकारे याचा परिणाम होईल. याशिवाय, उद्योगधंद्याचे चक्र सुरु झाल्यानंतर विविध माध्यमातून  गरिबांपर्यंत पैसा पोहोचणे अधिक परिणामकारक ठरेल, असे आम्हाला वाटते. गरिबांना थेट मदत देण्याविषयी बोलायचे झाले तर केंद्र सरकार त्यांना अन्नधान्य पुरवत आहे, असे सीतारामन यांनी म्हटले.