कोटा : केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात चहाचे शौकीन कमी नाहीत. अशा चहा शौकीनांसाठी आणखी एक आनंदाची बातमी. या मंडळींना चहाचा नवा स्वाद चाखायला मिळणार असून, त्याची सुरूवातही झाली आहे. चहा शौकीनांना ऑलिव्हच्या पानांपासून बनवलेला 'ग्रीन टी' (Green tea)लवकरच प्यायला मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील शेतीत हा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. सर्व चहांना पर्यंय ठरेल असा 'ग्रीन टी' ऑलिव्हच्या पानांपासून बनविण्यात आला आहे. राजस्थानचे कृषीमंत्री प्रभू लाल सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या चहाचे नाव 'ओलिटिया ब्रँड', असे ठेवण्यात आले आहे.  मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या हस्ते या ब्रँडचे लवकरच लॉंचिंग होईल. या ब्रँडची लॉंचिंगपूर्व सर्व तयारी पूर्ण झाली आहे, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर कार्यक्रमासाठी तारीख मिळताच हा ब्रँड लॉंच केला जाईल. ऑलिव्हच्या पानांपासून बनवलेला ग्रीन टी हा देशातील आणि जगातील सर्व चहांना पहिल्यांदाच पर्याय ठरू शकेल', असा विश्वासही सैनी यांनी व्यक्त केला.


'ओलिटिया ब्रँड' आणि ऑलिव्हच्या पानांपासून बनवलेला ग्रीन टी याबाबत अधिक माहिती देताना सैनी यांनी सांगितले की, 'राजस्थानमध्ये इस्रायलच्या मदतीने २०१७ पासून ऑलिव्हची शेती करण्यास सुरूवात करण्यात आली. ऑलिव्हच्या संशोधनासाठी बिकानेरमध्ये एक संशोधन केंद्रही सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऑलिव्हबाबत संशोधन करणारे हे देशातील पहिलेच संशोधन केंद्र ठरले आहे. राजस्थानमध्ये ऑलिव्हपासून मधनिर्मिती करण्यासही सुरूवात झाली आहे'. ऑलिव्हपासून चहा निर्मिती करण्याचा विचार कसा सुचला, असा प्रश्न विचारताच सैनी सांगतात की, 'मी स्वत: कृषी विभागातून पीएचडी केली आहे. त्यामुळे मला माहित आहे की, ऑलिव्हची पाने किती आरोग्यदायी आहेत. त्यामुळे यावर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रयोगशाळाही उभारली आहे.'