नवी दिल्ली - स्वतःचे घर हा प्रत्येक मध्यमवर्गीय माणसासाठी महत्त्वाचा विषय असतो. पण अलीकडे घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचा विचारच सामान्य माणूस करू शकत नाही. घरनिर्मितीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किंमतीही वाढल्यामुळे घर बांधायचे म्हटले तरी ते महाग जाते. घरासाठी लागणारी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सिमेंट. सिमेंटचे दरही वाढताहेत आणि त्यावर जीएसटी लावल्यामुळे त्याच्या किंमती आणखी वाढतात. आता सिमेंटवरील जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव पुढील जीएसटी परिषदेमध्ये मांडण्यात येईल. जर त्याला मंजुरी मिळाली, तर सिमेंटचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे घरनिर्मितीच्या खर्चातही कपात होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटीचे दर ठरविण्यासाठी जीएसटी परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होईल. या परिषदेत देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्री सहभागी असतात. या बैठकीत सर्वाधिक जीएसटी आकारला जाणाऱ्या वस्तूंचाही फेरविचार केला जाऊ शकतो. या वस्तूंवर सर्वाधिक २८ टक्के जीएसटी आकारला जातो. २८ टक्के जीएसटी आता तर्कसंगत करण्याचा विचार केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या नेतृत्त्वाखालील जीएसटी परिषदेने गेल्या दीड वर्षांत १९१ वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी दर कमी केला होता. 


ऐशोआरामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरच यापुढे २८ टक्के जीएसटी आकारला जाण्यावरही या बैठकीत विचार केला जाईल. अन्य सर्व वस्तूंवरील जीएसटी दर कमी केला जाईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, २२ डिसेंबरला जीएसटी परिषदेची बैठक होते आहे. सिमेंटवरील जीएसटी दर कमी केल्यामुळे घरनिर्मिती व्यवसायाला चालना मिळेल. तसेच यामुळे या क्षेत्रातील रोजगारही वाढेल. 


सर्वाधिक जीएसटी आकारल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये सिमेंट, वाहनांचे स्पेअर पार्ट, कार, विमान, सिगारेट, पान मसाला या सारख्या वस्तूंचा समावेश आहे.