नवी दिल्ली : देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. या खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार आणि दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

GST म्हणजे गूड अॅण्ड सिंपल टॅक्स आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लोकार्पण सोहळ्यावेळी सांगितलं. GSTमुळे देशाची अर्थव्यवस्था एका सूत्रात बांधली जाईल, असं मोदींनी सांगितलं. शिवाय ज्याप्रमाणे चष्म्याचा नंबर वाढल्यावर तो बदलताना जितका त्रास होतो, त्याचप्रमाणे ही नवी करप्रणाली अंमलात आल्यानंतर ती आत्मसात करण्यासाठी थोडाकाळ त्रास सहन करावा लागेल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


पंतप्रधानांनी यावेळी गीतेतील 18 अध्यायांप्रमाणेच GSTसाठी स्थापन झालेल्या काऊन्सिलच्या 18 बैठका झाल्या असल्याचं सांगितलं. तसेच GSTमुळे देशाच्या इतिहासात मोठा बदल घडेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


उद्योग क्षेत्राला याच्या फायद्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या नव्या व्यवस्थेमुळे 20 लाखापर्यंतची उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना पूर्ण सूट मिळाली आहे. तर 75 लाखापर्यंतची उलाढाल असणाऱ्यांना थोडाच कर भरावा लागेल. देशातल्या गरिबांसाठी ही नवी करप्रणाली फायदेशीर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.