गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी लागला 1000 कोटींचा सट्टा
सध्या अवघ्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यामुळे आक्रम झालेली कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात कोण बाजी मारणार यावर सट्टाबाजार तेजीत आला आहे.
नवी दिल्ली : सध्या अवघ्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यामुळे आक्रम झालेली कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात कोण बाजी मारणार यावर सट्टाबाजार तेजीत आला आहे.
भाजपला मिळणार 118 ते 120 जागा
तेजीत असलेल्या सट्टाबाजारात सध्या भाजपसाठी 'अच्छे दिन' दिसत आहेत. सट्टा बाजारातील वृत्तानुसार भाजप पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरेल. सोबतच भाजपला 118 ते 120 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, कॉंग्रेसला केवळ 80 ते 100 जागांवर समाधान मानावे लागेल, असे सट्टाबाजाराचा अंदाज आहे. भाजप पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन करेल. पण, पाठिमागच्या वेळेसारखी विशाल विजयाची भाजपला आशा ठेवता येणार नाही. पण, भाजप ही आशा बाळगून असल्याचे सट्टाबाजारातील सूत्रांचे म्हणने आहे.
सट्टाबाजारात शिवसेनेने भाजप कॉंग्रेसलाही टाकले मागे
सट्टाबाजारातील सूत्रांकडील माहितीनुसार, सट्टाबाजारात भाजपला 1 रूपया लावला जात आहे. या एकरूपयाच्या बदल्यात विजेता व्यक्तीस 1 रूपये 15 पैसे मिळतील. तर, कॉंग्रेसवर हाच सट्टा वाढताना दिसत आहे. कॉंग्रेसवर 1 रूपया लावल्यास 1 रूपयाच्या बदल्यात 3 रूपये मिळणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात कॉंग्रेसच्या पराभवाची जोरदार हवा चालल्याने कॉंग्रेसवर 1 रूपयाला 7 रूपये लावले गेल्याची चर्चा होती. मात्र, धक्कादायक असे की, कॉंग्रेस आणि भाजप शिवाय गुजरातमध्ये यश मिळू शकणाऱ्या पक्षात महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष शिवसेना आणि केजरीवाल यांच्या 'आम आदमी पक्षा'चाही समावेश आहे. 'आप'च्या विजयावर 1 रूपयाला चक्क 25 तर, शिवसेनेवर 1 रूपयाच्या बदल्यात 30 रूपयांचा सट्टा लागत आहे.
सट्टेबाजारातील दर वाढणार
दरम्यान, निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत जाईल तसतशी प्रचाराला जोरदार रंगत येणार आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध कॉंग्रेस हा सामना आधिक संघर्षपूर्ण होणार यात शंका नाही. याचा परिणाम दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या मताधिक्यावर नक्कीच होणार. त्यामुळे सट्टा बाजारातील दरही आणखी वाढले जाण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार निवडणूक
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका होत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील निवडणुकीची मतमोजनी 18 डिसेंबरला होणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले आहेत. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात आहे.