गुजरात राज्यात कोविड-१९ सेंटर रुग्णालयाला आग, आठ रुग्णांचा मृत्यू
गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरला आग लागल्याने आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबई : गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरला आग लागल्याने आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, काही रुग्णांना कोविड सेंटरमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती देण्यात आलेय.
कोविड-१९ सेंटरला आग लागल्याची माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात आले आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या आगीचे कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली त्यावेळी आरडा-ओरडा किंकाळ्यांचा आवाज येत होता. कोणाला काय झालेय, हेच समजत नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अनेक रुग्णांनी पळापळ करण्यात सुरुवात केली.
दरम्यान, कोविड -१९ सेंटर असलेल्या श्रेय रुग्णालयात पहाटे आग लागल्याने अनेक जण झोपेत होते. त्यामुळे कोणाला काही माहिती मिळाली नाही. एकच गोंधळ निर्माण झाल्याने अनेक रुग्ण भीतीच्या छायेखाली होते. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.