‘चाणक्य नाहीतर ताकद आणि पैशांच्या भरोशावर भाजपचा विजय’ - हार्दिक पटेल
गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशीनसोबत छेडछाड करुन निवडणूक जिंकणा-यांना शुभेच्छा देतो’, असे ते म्हणाले.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशीनसोबत छेडछाड करुन निवडणूक जिंकणा-यांना शुभेच्छा देतो’, असे ते म्हणाले.
ईव्हीएममध्ये छेडछाड
हार्दिक पटेल म्हणाले की, ‘मी अनेक दिवसांपासून अहमदाबाद आणि राजकोटच्या काही खास जागांवर टॅंपरिंगबाबत बोलत आहे. या जागांवर विजयाचा फरक ५०० ते १००० मतांचा आहे. इथे टॅंपरिंग इतक्या सावधानतेने केली गेलीये की, लोकांना अजिबात शंका येऊ नये. कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी ईव्हीएममध्ये करण्यात आलेल्या छेडछाडी विरोधात आवाज उठवला पाहिजे’.
मतांचा इतका फरक कसा?
ते पुढे म्हणाले की, ‘अशा अनेक जागा आहेत जिथे भाजपचे उमेदवार ४००-५०० मतांनी विजयी होत होते, पण त्याच ईव्हीएममधील मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली तेव्हा विजय-पराभवाचं अंतर सहा हजारपेक्षा जास्त मतांचा झाला. याने सिद्ध होतं की, ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यात आलीये.
अमित शाह यांच्या रणनितीवर टीका
अमित शाह यांच्या रणनितीवरही हार्दिक पटेल यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘कोणत्या चाणक्याच्या रणनितीने विजय मिळालेला नाहीये. हा विजय पैसा आणि ताकदीच्या भरोशावर मिळवला आहे. माझं आंदोलन सुरूच राहणार आहे. भाजप विजयी झाली आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा तुरूंगात जाण्यास तयार आहे.