नवी दिल्ली : गुजरात हायकोर्टाने सोमवारी २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणावर निर्णय दिला आहे. कोर्टाने २०११ मध्ये आलेल्या एसआयटी कोर्टाचा निर्णय बदलून ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर २० दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यासोबतच कोर्टाने पीडित कुटुंबियांना १०-१० लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. 


२००२ मध्ये साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ डब्याला २७ फेब्रुवारी २००२ ला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगे भडकले होते. या डब्यात ५९ लोक होते. ज्यातील अनेक लोक हे अयोध्यावरून परत येणारे ‘कार सेवक’ होते. 


एसआयटीच्या विशेष न्यायालयाने एक मार्च २०११ ला याप्रकरणी ३१ लोकांना दोषी ठरवले होते. तर ६३ लोकांना निर्दोष सोडले होते. त्यातील ११ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आणि २० दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 


एसआयटी कोर्टानं दोषी ठरविलेल्या आरोपींच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तर, ६३ लोकांना निर्दोष ठरविण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं आव्हान दिलं होतं. या दोन्ही याचिकेवर आज सुनावणी झाली असता न्यायालयानं आरोपींना दिलासा दिला.