गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्रीपदी कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्या मते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला आणि नितिन पटेल ही नावे सर्वात पुढे आहेत. तर सी आर पाटील यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गुजरातमधील भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री निवडण्यात येतील. आमदारांच्या बैठकीसाठी मनसुख मांडविया आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल गांधीनगरमध्ये पोहचले आहेत. भाजपच्या अन्य बड्या नेत्यांनीही पक्षाच्या कार्यालयात येऊन सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा केली.


राजीनाम्यानंतर रुपाणीने काय म्हटले
विजय रुपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी म्हटले की, मी भाजपचा कार्यकर्ता आहे भाजपमध्ये वेळो वेळी जबाबदाऱ्या बदलत असतात. 


मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले की, त्यांना जी जबाबदारी दिली जाईल ते ती पार पाडतील. त्यांनी म्हटले की,  कोरोना काळात आमच्या सरकारने चांगले काम करून लोकांची मदत केली आहे. सरकारने पूर्ण संवेदनशीलतेने काम केले आहे.


मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अचानक राजीनाम्यामुळे विरोधी पक्षाने भाजपवर टीका केली आहे. क्रॉंग्रेस नेता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे की,  भाजपशासित सर्व प्रदेशांमध्ये पक्षाअंतर्गत कलह आहे.