अहमदाबाद : मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील भरुच येथे जवळपास १०० ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा एक ट्रक अचानक पलटी झाला. 


या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भरुच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप सांगले यांनी सांगितले की, ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन हा ट्रक जम्बूसरहून भरुच शहरात असलेल्या गोदामात नेले जात होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. 


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी हे ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, या मशीन्सचा वापर झालाच नाही अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 


या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि रस्त्यावर पडलेल्या मशीन्स गोळा करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या. 


भरुच जिल्ह्यातील देरोल गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील तीन कामगार जखमी झाले. या ट्रकमध्ये १०३ व्हीव्हीपॅट, ९२ मतदान युनिट आणि ९३ कंट्रोल युनिट्स होते. अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे.