नवी दिल्ली : लग्नसोहळा म्हटलं की प्रत्येक शहराची, प्रांताची आणि गावाची अशी वेगळी प्रथा असते. पंथ आणि राहणीमान जसजसं बदलत जातं, तसतसं गावोगावी असणाऱ्या विवाहसोहळ्याच्या पद्धतीही बदलतात. अशीच एक पद्धत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ही प्रथा आहे गुजरातच्या आदिवासी समुदायातील विवाहप्रथेची. ही प्रथा आता तेथील काही खेड्यांमध्ये प्रचलित आहे. ज्याअंतर्गत नवरदेव त्याच्याच लग्नात प्रवेश करु शकत नाही. त्याच्या अनुपस्थितीत नवरदेवाच्या अविवाहित बहिणीकडून हे विधी संपन्न केले जातात. त्यावेळी नवरदेव हा त्याच्या आईसोबत स्वत:च्याच घरात असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरखेडा गावचे रहिवासी कांजीभाई राठवा यांनीच याविषयीची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. 'परंपरागत स्वरुपात जे विधी नवरदेवाकडून पार पाडले जातात, त्याच्याऐवजी इथे ते विधी त्याची बहीण पार पाडते. तिच बहीण भावाऐवजी नवरी मुलीसोबत सप्तपदीही घेते', असं ते म्हणाले. त्या परिसरातील तीन खेड्यांमध्ये ही प्रथा प्रचलित असल्याचंही ते म्हणाले. या प्रथेचं पालन न केल्यास अशुभ घटना घडतात, असा स्थानिकांचा समज आहे. 


मुख्य म्हणजे नवरदेव त्याच्याच विवाहसोहळ्यात हजेरी लावू शकत नसला तरीही तो तयार मात्र अगदी इतर नवरदेवांप्रमाणेच झालेला असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. सुरखेडा, साणदा आणि अमबल या गावांमध्ये अशी मान्यता आहे की, या गावांतील पुरुष देवता अविवाहित आहेत. ज्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ गावकरी त्यांच्या घरातील नवरदेवांना घरातच ठेवतात. त्यांच्या घरातील नवरी मुलीचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठीच ही प्रथा पाळली जाते असं म्हणतात.