अहमदाबाद : अहमदाबादमध्ये सध्या 'सरदार पटेल मोटेरा क्रिकेट स्टेडियम'च्या पुननिर्माणाचं काम जोरात सुरू आहे. हे नवं क्रिकेट स्टेडियम म्हणजे एक 'वर्ल्ड रेकॉर्ड' ठरणार आहे. या क्रिकेट स्टेडियमची पुननिर्माण प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. हे क्रिकेट स्टेडियम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून या वर्षाअखेरीस स्टेडियमचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ७०० करोड रूपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या स्टेडियमची क्षमता ऑस्ट्रेलियातील मेलबर्नहून अधिक आहे. मोटेरामध्ये सुरू असलेले हे क्रिकेट स्टेडियम ६३ एकर जमिनीवर उभारलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्टेडियमला आधीच्याच जागेवर पुन्हा बांधण्यात येत आहे. २०१५ च्या शेवटी जुनं स्टेडियम तोडून नवीन स्टेडियम उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. स्टेडियम बांधण्यासाठी 'लार्सन ऍन्ड टर्बो' (एल ऍन्ड टी) या कंपनीशी करार करण्यात आला आहे. मार्च २०१७ पासून स्टेडियमच्या पुननिर्माणास सुरूवात करण्यात आली. नवीन स्टेडियममध्ये १ लाख १० हजार प्रेक्षकांना एकत्र मॅच पाहता येण्याची क्षमता असेल. संपूर्ण स्टेडियममध्ये चारही ठिकाणी एकही पिलर किंवा खांब उभारण्यात आलेला नाही. मॅच बघताना अडथळा होऊ नये यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे. 



संपूर्ण स्टेडियमध्ये म्युझिक सिस्टम, एलईडी लाईट बसवण्यात येणार आहे. स्टेडियमच्या कामासाठी जवळपास ३ हजार कामगार कार्यरत असून सहा मोठ्या क्रेनही उभ्या आहेत. स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये खाण्या-पिण्याच्या सोयीसह सोफासेट, टीव्ही, २०-२५ लोकांसाठी बैठकीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्टेडियममध्ये क्लब हाउसही बांधण्यात येणार आहे. यात स्विमिंग पूल, हॉटेल, बॅन्क्वेट हॉल, इनडोअर गेम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. स्टेडियममध्ये ३ हजार चार चाकी आणि १२ हजार दुचाकी पार्क करण्याची सुविधा करण्यात आली आहे. २०१९च्या अखेरीस गुजरातमध्ये उभा राहणारा हा 'वर्ल्ड रेकॉर्ड' सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.