चंदीगड : साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह याच्याविरोधात शुक्रवारी न्यायालय निकाल देणार आहे. शुक्रवारी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयात निर्णय सुनावला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता आणि राम रहीमचे समर्थक प्रशासनाला खुलं आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळेच हरियाणा सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. हरियाणा सरकारने कलम १४४ लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेजेस २५ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


हरियाना सरकारने सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कर्मचा-यांच्या सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


पंचकुलामधील शाळा-कॉलेजेस बंद


परिस्थिती पाहता सरकारने २४ आणि २५ ऑगस्ट रोजी पंचकुला जिल्ह्यात शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.


राम रहीमच्या समर्थकांना काठी आणि हत्यारं आणण्यास मनाई 


डेरा समर्थकांनी पंचकुलातील 'नाम चर्चा घर' येथे तसेच बाग, रस्त्यांवर गर्दी केली आहे. अनेक जण पंचकुलात दाखल होत आहेत. या सर्व समर्थकांसोबत काठी किंवा इतर हत्यारं आणण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राम निवास यांनी दिली आहे.


सुरक्षेसाठी होमगार्ड, पोलीस, निमलष्करी दल


हरियाणात निमलष्करी दले मागवली आहेत. पंजाबमध्ये ७५ आणि हरियाणात ३५ दले सुरक्षेसाठी तैनात आहेत. संवेदनशील जागांवर १० वरिष्ठ आयपीएस अधिका-यांना तैनात करण्यात आलं आहे. तसेच २००० होमगार्ड्सलाही पाचारण करण्यात आलं आहे.


चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमचं तात्पुरता बनवला जेल


चंदीगडच्या गृह विभागाने सेक्टर १६मध्ये असलेलं क्रिकेट स्टेडियम २५ ऑगस्ट रोजी तात्पुरत्या तुरुंगात बदलण्यात येणार आहे.