चंदीगड  : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रह‌ीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्याचा निकाल आज निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहीम यांच्याविरोधात निकाल लागल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंजाब व हरयाणामधील मोबाइल व इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद केली आहे. तसेच चंडीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पंचकुला जिल्ह्यातील शाळा, कॉलेजही बंद ठेवण्यात आली आहेत. पंजाब व हरयाणाच्या दिशेने येणाऱ्या सर्व ट्रेनही रद्द करण्यात आल्या आहेत.


राम रहीम यांच्यावर त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर १६ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे. हा निकालाच्या प्रतिक्षेत डेरा सच्चा सौदाचे ३५ हजार अनुयायी पंचकुला येथे पोहोचले आहेत.  राम रहीम सिंग यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पंचकुला येथील सेक्टर २३मधील ‘नाम चर्चा घर’ या ठिकाणी थांबले आहेत. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलांचे हजारो जवान तसेच निमलष्करी दलाच्या १५ हजार जवानांना पंजाब व हरयाणातील संवेदनशील क्षेत्रांत तैनात करण्यात आले आहे.


 राम रहीम यांनी  केले शांततेचे आवाहन


'माझा देवावर पूर्ण विश्वास असून मी कायद्याचाही आदर करतो. पाठदुखीचा त्रास असूनही मी या निकालादरम्यान न्यायालयात उपस्थित राहणार आहे. सर्वांनी शांतता राखावी.' असे आवाहन राम रहीम यांनी अनुयायांना केले.



 


व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्वीटर या सोशल मिडीयाच्या माध्यमातून विनाकारण अफवा पसरविल्या जाऊ नयेत, या हेतूने पंजाब व हरयाणामधील मोबाइल व इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद करण्यात आली आहे.