`आपण बनवलेला जॅम भाजप नेत्यांना दिला तर...` सोनिया गांधींना वेगळीच शंका; पाहा Video
Rahul Gandhi video : भारतीय राजकारणात सतत चर्चेत असणाऱ्या राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या अनेकांना आवडतोय. या व्हिडीओमध्ये त्यांची आईसुद्धा सोबत दिसतेय.
Rahul Gandhi video : असं म्हणत की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणूस काही ना काही शिकत असतो. मोठीमोठी नेतेमंडळीही यासाठी अपवाद नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सोशल मीडियावर चर्चेत असणारा एक व्हिडीओ हीच बाब अधोरेखित करताना दिसतोय. कारण, या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा त्यांचा स्वयंपाकघरातील गोष्टींमध्ये असणारा हातखंड पाहायला मिळत आहे. यावेळी स्वयंपाकघरात ते त्यांच्या आईसह म्हणजेच सोनिया गांधी यांच्यासह एक खास पदार्थ बनवताना दिसत आहेत.
माय-लेकानं बनवला एक कमाल पदार्थ
राहुल गांधी आणि त्यांची आई, सोनिया गांधी यांनी बनवलेला हा पदार्थ म्हणजे ऑरेंज मार्मलेड (orange Marmalade). झाडावर लागलेली इवलिशी संत्री तोडण्यापासून ती स्वच्छ करून त्यांचे समसमान तुकडे करण्यापर्यंत आणि ही संत्री मऊ होईपर्यंत शिजवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : New Year 2024: यंदाच्या वर्षी तुम्ही नेमके किती वर्षांचे होणार?
संत्र्यांचा गर, रस, त्यांची साल, साखर या सर्व गोष्टी एकजीव करून अखेर तयार होणारा मार्मलेड जगभरात बराच लोकप्रिय. इथं मात्र राहुल आणि सोनिया गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्या रेसिपीला पसंती दिली आहे. या व्हिडीओच्या निमित्तानं पाहणाऱ्यांना एका नव्या पदार्थाची रेसिपी कळण्यासोबतच स्वयंपाकघरात राहुल गांधी नेमके किती अनुभवी आहेत हेसुद्धा पाहता आलं.
भाजप नेत्यांनाही मिळणार जॅम...
स्वयंपाकघर म्हटलं की, तिथं होणारे विनोद आलेच. याच विनोदांमध्ये राहुल गांधींना भाजप नेत्यांचीही आठवण झाली. 'आपण हा जॅम (मार्मलेड) भाजप नेत्यांना हवा असेल तर त्यांनाही देऊ... ' असं ते मोठ्या गमतीत म्हणाले असता, 'ते तो जॅम आपल्याकडेच भिरकावतील' अशी मनातील मोठी गमतीशीर शंका सोनिया गांधी यांनी लेकापुढे बोलून दाखवली आणि मग तिथं एकच हशा पिकला.
स्वयंपाकघरातील या गप्पांच्या सत्रामध्ये राहुल गांधी यांच्या काही सवयी आणि एक मुलगा म्हणून त्यांचं वेगळं रुप सोनिया गांधी यांनी सर्वांपुढे आणलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वारंवार पाहिला जातोय. तुम्ही पाहिला का?