नवी दिल्ली : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत चर्चांचं केंद्र बनलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने काँग्रेस पक्षाला एक अल्टिमेटम दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पटेलने शनिवारी पाटीदार समाजाला आरक्षण देण्यावर आपली भूमिका स्पष्ट करा असा थेट प्रश्न काँग्रेस पक्षाला विचारला आहे. हार्दिक पटेलने काँग्रेस पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे.


दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांची भेट झाल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या.


गुजरातमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी एक व्हिडिओ फुटेज दाखवलं होतं. या व्हिडिओत हार्दिक पटेल एका हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे आणि त्याच हॉटेलमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी थांबले होते.



या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी ट्विट करत म्हटलं की, मी त्या दिवशी हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवानी यांची भेट घेतली. आता आयबी आणि पोलिस त्या हॉटेलची तपासणी करत आहेत. गांधीजींच्या गुजरातमध्ये हे काय सुरु आहे?


हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवानी हे गुन्हेगार आहेत का? ज्यावेळी त्यांची भेट भाजप नेत्यांसोबत झाली होती त्यावेळी त्यांच्या कार्यालयांची तपासणी, झडती घेण्यात आली नाही? मग, आता असं का केलं जात आहे? असे प्रश्नही अशोक गहलोत यांनी उपस्थित केले. 


यानंतर २४ ऑक्टोबर रोजी पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन देण्यासाठी सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण देण्याची अट ठेवली.