उद्योजक हर्ष गोयंका (Industrialist Harsh Goenka) यांनी एक्सवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुढील काही दिवसांत एक बाळ जन्माला येणार असल्याचं सांगितलं आहे. हर्ष गोयंका यांनी या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांचा इशारा भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडे असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये बाळाच्या करिअरबद्दल चर्चा केली आहे. यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टवर तुफान कमेंट्स केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्ष गोयंका यांनी पोस्टमध्ये बाळ वडिलांप्रमाणे एक कौशल्यवान क्रिकेटर होईल की आईप्रमाणे चित्रपटसृष्टीत करिअर करेल अशी विचारणा केली आहे. हर्ष गोयंका यांनी नावांचा उल्लेख केला नसला तरी त्यांची पोस्ट विराट कोहली आणि अनुष्का शर्माबद्दल आहे हे समजत आहेत. दरम्यान त्यांनी वापरलेल्या हॅशटॅगनुसार बाळ लंडनमध्ये जन्माला येणार असल्याचं समजत आहे. 


"पुढील काही दिवसांत एक बाळ जन्माला येणार आहे. आपल्या महान क्रिकेटर वडिलांप्रमाणे हे बाळ भारताला एका नव्या उंचीवर नेईल अशी आशा आहे. किंवा आईप्रमाणे फिल्मस्टार होण्याचा मार्ग निवडेल?", असं हर्ष गोयंका म्हणाले आहेत. #MadeInIndia #ToBeBornInLondon हे दोन हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.



हर्ष गोयंका यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, 'किंवा बाळ आपल्या आई-वडिलांच्या यशाचं ओझं खांद्यावर न बाळगता एक सर्वसामान्य व्यक्तीही होऊ शकते'.


दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, "सर, ते बाळाला ठरवू द्या. तुमचं याच्याशी काही देणंघेणं नाही. पण तरीही आम्हाला बाळाच्या वडिलांकडून अनेक रेकॉर्ड मोडले जाण्याची अपेक्षा आहे". "अद्याप जन्मालाही न आलेल्या बाळावर आतापासून अपेक्षांचा ओझं टाकलं जात आहे. त्याला त्याच्या पद्दतीने मोठं होऊ द्या," असं एकाने म्हटलं आहे.


अनुष्का शर्मा प्रेग्नंट?


एबी डेव्हिलिअर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन चाहत्यांशी संवाद साधताना अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा खुलासा केला होता. विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील (England) महत्त्वाच्या मालिकेतून ब्रेक घेतल्याने चाहते वेगवेगळे अंदाज लावत असतानाच एबी डेव्हिलिअर्सने हा खुलासा केला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या आपल्या दुसऱ्या बाळाची प्रतिक्षा करत असल्याचं त्याने सांगितलं होतं. पण नंतर त्याने माफी मागितली होती. 


"माझा मित्र विराट कोहली सध्या उपलब्ध नाही. त्याला हवी असणारी गोपनीयता द्यावी अशी मी प्रत्येकाला विनंती करत आहे. कुटुंब नेहमीच प्राथमिकता असते. नक्की काय सुरु आहे हे कोणालाच माहिती नाही. प्रत्येकाने त्याचा आदर करावा असं माझं म्हणणं आहे. मी मागच्या माझ्या कार्यक्रमात थोडा गोंधळ घातला आणि त्यासाठी मी विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागत आहे," असं एबी डेव्हिलिअर्सने म्हटलं आहे.