तुमच्यासाठी मोबाईल किती महत्त्वाचा आहे, असं जर कोणी विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल. कदाचित तुम्ही फार महत्त्वाचा आहे असंच सांगाल. इतका महत्त्वाचा की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो एक सेकंदही सोबत नसेल तर व्यथित व्हायला होतं. इतकंच नाही तर एखादी व्यक्ती जितकी फोनमध्ये व्यग्र असेल तितकी ती मोठी असते असाही एक गैरसमज असतो. पण तुमचं हे व्यसन तुमच्या प्रिय व्यक्तींना तुमच्यापासून दूर करत असतं. अजाणतपेणाने आपण मोबाईलच्या प्रेमापोटी अनेक मोलाचे क्षण गमावत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही लोकांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक्सवर एक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फोनचं व्यसन आणि त्याच्या उपस्थितीमुळे इतरांना होणारा त्रास याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. 


हर्ष गोयंका यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर मोटिव्हेशनल स्पीकर Simon Sinek यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ते मोबाईलमुळे काय फरक पडतो हे समजावून सांगण्यासाठी मोबाईल मागतात. पुढे ते सांगतात की, जर तुम्ही हातात मोबाईल घेऊन बोलत असाल तर समोर बसलेल्या व्यक्तीला तुम्ही त्यांना प्राथमिकता देत नसल्याचं वाटतं. तसंच जर तुम्ही जेवताना किंवा मीटिंगमध्ये असताना मोबाईल समोर टेबलावर ठेवला तर ही वेळ तुमच्यासाठी मोलाची नाही असा संदेश जाऊ शकतो. 



त्यांनी पुढे सल्ला देताना सांगितलं की, अशावेळी फोन सायलेंट मोडवर किंवा पाकिटात ठेवा. हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिली आहे की, स्क्रीनपासून दूर जा, जगाचा अनुभव घ्या आणि क्षणात जगण्याचा आनंद पुन्हा शोधा.


हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत आपलं मत मांडलं आहे. एका युजरने स्क्रीनकडे दुर्लक्ष करणं फार सोपं नसल्याचं म्हटलं आहे. कारण अनेकदा महत्त्वाचे फोन येत असतात. तर एकाने फोन सायलेंट मोडवर ठेवणं त्या स्थितीवर आधारित असल्याचं सांगितलं. एका युजरने टोला मारत म्हटलं की, सर्वांनी हा प्रेरणादायी व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्येच पाहिला आहे.