रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: राज्यातील भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उलटा चमत्कार घडू शकतो, असा दावा करणाऱ्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपने पलटवार केला आहे. यशोमती ठाकूर भाजपचे नेते संपर्कात असल्याचे सांगतात. मात्र, सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का, असा सवाल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता परत येण्याचं लॉलीपॉप दाखवतायंत'

राज्य सरकारने सध्या कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करावे. हे काम करण्याऐवजी नको ते मुद्दे उकरुन काढले जात आहेत. प्रशासन कुठे आहे तेच दिसत नसल्याची टीकाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. 
तसेच मी किंवा दिल्लीत फडणवीस यांच्यासोबत आलेल्यांपैकी कोणताही नेता भाजपवर नाराज नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. कालच देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंग नाईक निंबाळकर या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. 

यानंतर राजकीय वर्तुळात फडणवीस आणि शाह यांच्या भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. आमच्या संपर्कात भाजपच्या १०५ आमदारांपैकी काही आमदार असल्याची बातमी बाहेर आल्यानंतर फडणवीसांना दिल्लीला जावं लागले. आम्ही एक आहोत, असं स्पष्टीकरण त्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींना द्यावं लागले, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते.