'भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता परत येण्याचं लॉलीपॉप दाखवतायंत'

भुजबळांची फडणवीस - शहा भेटीवर खोचक टीका

Updated: Jul 17, 2020, 06:59 PM IST
'भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता परत येण्याचं लॉलीपॉप दाखवतायंत' title=

योगेश खरे,  झी मीडिया, मुंबई: राज्यातील भाजपचे आमदार फुटू नयेत यासाठीच देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवले जात असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. तत्त्पूर्वी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावर भुजबळ यांनी खोचक टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. या काळात भाजपच्या आमदारांनी इकडे-तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून त्यांना सत्ता परत येणार, असे लॉलीपॉप दाखवले जात असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. 

राजस्थान झाले आता महाराष्ट्रात सत्तांतर; रामदास आठवलेंचे भाकीत

सध्या राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसची सत्ता डळमळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचे नेते सावध झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईत महाविकासआघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. 

दिल्लीत अमित शाहंना भेटल्यावर फडणवीसांनी मोदींच्या भेटीची वेळ मागितली

दरम्यान, आज भुजबळ यांनी नाशिकच्या लॉकडाऊनसंदर्भातही भाष्य केले. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते आल्यानंतर नाशिकच्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. 

शाहंसोबतच्या बैठकीत काय झालं?
अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंग नाईक निंबाळकरही सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या समस्येसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.