चंदीगढ: हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीत बहुमत न प्राप्त करू शकलेल्या भाजपने शुक्रवारी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीशी (जेजेपी) हातमिळवणी केली. जेजेपीला विधानसभेच्या ९० जागांपैकी १० ठिकाणी विजय मिळाला होता. तर भाजपला ४० जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे हरियाणात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हरियाणात कोणाची सत्ता येणार, याची उत्सुकता सर्वांना होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी वेगाने सूत्रे हलवत जेजेपीशी युतीचा फॉर्म्युला पक्का केला. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषेदत अमित शाह यांच्याकडून दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करण्यात आली. जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचे शाह यांनी सांगितले. तसेच जेजेपीला २ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात येईल. शनिवारी विधीमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर कुणाकुणाला मंत्रिपद द्यायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. 



दरम्यान, भाजपला ९ अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिली आहे. त्यामुळे जेजेपीच्या पाठिंब्यानंतर भाजप-जेजेपी सरकारचे संख्याबळ ५९ इतके झाले आहे. त्यामुळे भाजपचे मनोहरलाल खट्टर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. तर दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.