Haryana Crisis: लोकसभेआधी मोठा धक्का; भाजपाची एका राज्यात युती तुटली, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
Manohar Lal Khattar: मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मनोहरलाल खट्टर यांच्यासह मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे.
Manohar Lal Khattar: हरियाणात राजकीय संकट निर्माण झालं आहे. भाजपा आणि जननायक जनता पार्टीची (जेजेपी) युती तुटणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. हरियाणात भाजपा नेते मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री असून, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मनोहरलाल खट्टर यांच्यासह मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद झाल्याने ही युती तुटत असल्याची माहिती आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज सकाळी राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपला राजीनामा सादर केला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत जागावाटपावरुन वाद सुरु असल्याची चर्चा रंगलेली असतानाच ही घडामोड घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोहरलाल खट्टर आश्चर्याचा धक्का देत करनालमधून निवडणूक लढू शकतात.
90 सदस्यांच्या विधानसभेत भाजपा 40 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाला अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करु शकतो असा विश्वास आहे. आतापर्यंत भाजपा दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीसह युतीत सत्तेत होतं.
भाजपा आणि जेजेपीने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2019 मध्ये भाजपाने जबरदस्त कामगिरी करत सर्वच्या सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान नुकतीच स्थापन झालेल्या जेजेपीचा मात्र सातही जागांवर पराभव झाला होता. पण त्यांची मतांची टक्केवारी मात्र लक्ष वेधणारी होती. 2019 विधानसभा निवडणुकीत जेजेपीने 10 तर भाजपाने 40 जागा जिंकल्या होत्या. भाजपाला बहुमतासाठी 6 जागा कमी पडल्या होत्या.
सध्या भाजपाचे संजय भाटिया यांच्याकडे असलेल्या कर्नाल मतदारसंघातून मनोहरलाल खट्टर लोकसभा निवडणुकीत उतरु शकतात. तर दुसरीकडे संजय भाटिया हे संसदेतून विधानसभेत जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.
यासह मनोहरलाल खट्टरच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशीही चर्चा आहे. यावेळी मात्र त्यांनी जेजेपीच्या जागी अपक्ष आमदारांचा पाठिंबा असेल. तसंच या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असू शकतात, जे दोन वेगळ्या जातींचं प्रतिनिधित्व करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भाजपाची रणनीती असू शकते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपाने हीच रणनीती अवलंबली होती.
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, जेजेपीचे पाच आमदार भाजपात प्रवेश करु शकतात. जोगी राम सिहाग, राम कुमार गौतम, ईश्वर सिंह, रामनिवास आणि देविंदर बबली हे ते पाच आमदार आहे. सूत्रांनी सांगितले की, हे पाच जण वेगळे गट स्थापन करून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.