बलात्कार : सत्यता तपासा, उगाच खळबळ माजवू नका - मुख्यमंत्री
राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांतून गेल्या काही काळात वारंवार येणाऱ्या बलात्काराच्या घटनांच्या बातम्यांनी हरियाणा सुन्न झाले आहे.
चंदीगड: राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांतून गेल्या काही काळात वारंवार येणाऱ्या बलात्काराच्या घटनांच्या बातम्यांनी हरियाणा सुन्न झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर करावाई करावी या मागणीसह मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री खट्टर यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ते अधिकच टीकेच्या गर्तेत सापडले आहेत.
सत्यता तपासा आणि मगच चर्चा करा
बलात्काराच्या घटना, त्याच्याबातम्या आणि त्यानंतर होणारी टीका यामुळे हेराण झालेल्या खट्टर यांनी चक्क या घटना आणि त्याच्या बातम्यांच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बलात्कार प्रकरणांवरून उगाचच खळबळ माजवू नका. आगोदर अशा प्रकरणांची सत्यता तपासा आणि मगच चर्चा करा, असा पवित्रा खट्टर यांनी घेतला आहे. त्यामुळे खट्टर यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर टीकेचा पाऊस पडत आहे.
अनेक घटनांत खोटे आरोप
दरम्यान, खट्टर यांनी याबाबत बोलताना चक्क एक उदाहरणच दिले आहे. खट्टर म्हणतात, राज्यात बलात्काराच्या घटनांची संख्या वाढलेली दिसते कारण, नोंदल्या गेलेल्या अनेक घटनांपपैकी अनेक घटनांत खोटे आरोप केले जातात. खट्टर यांच्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.
सरकारच्या विश्वासार्हता आणि गंभिरतेवर प्रश्नचिन्ह
पुढे बोलताना खट्टर यांनी म्हटले आहे की, १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार झाल्यास गुन्हेगाराला मृत्यूची शिक्षा देण्याबाबत सरकार कायदा करेन. दरम्यान, खट्टर यांनी शिक्षेबाबत हे विधान केले असले तरी, बलात्कार प्रकरणात गुन्हेगारांच्या शिक्षेबाबत सरकारच्या विश्वासार्हता आणि गंभिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.