Crime News : अनेकदा अडलेली कामं पूर्ण करुन घेण्यासाठी लाच (bribe) देण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. काही पोलिसांकडून लाच घेण्याचा प्रकारही अनेकदा पाहायला मिळतो. पण हरियाणाच्या (Haryana) फरीदाबादमध्ये समोर आलेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसलाय. म्हैस चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी एका तक्रारदाराला पोलिसांनाच लाच द्यावी लागली. पण या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे जे पोलीस अधिकाऱ्याकडून दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्या नोटा चक्क गिळण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरी गेलेली म्हैस शोधण्यासाठी मागितले पैसे


पोलिसाच्या या कृतीने सर्वच जण चक्रावले. तिथे असलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेरात कैद केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर -3मधील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाल याच्याविरुद्ध दक्षता विभागाला लाच घेतल्याची तक्रार मिळाली होती. महेंद्र पाल हा म्हैस चोरी प्रकरणात कारवाई करण्यासाठी पैसे मागत होता. त्याचवेळी अधिकाऱ्यांचे पथक तिथे आले आणि त्यांनी महेंद्र पालला 4000 रुपये लाच घेताना पकडले.


वैतागून दक्षता पथकाला दिली तक्रार


शंभूनाथने याप्रकरणी तक्रार केली होती. रविवारी शंभू नाथच्या घरासमोरुन कोणीतरी त्याची म्हैस चोरली होती. दुसऱ्या दिवशी शंभूनाथ चोरीची तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेला तेव्हा तिथे असणाऱ्या महेंद्रने कारवाई करण्यासाठी 15 हजारांची लाच मागितली. पण 10 हजारांवर हे प्रकरण मिटवण्याचे ठरले. यानंतर शंभूने आधी 4 आणि नंतर 2 हजार रुपये दिले. त्यानंतर महेंद्रने पैसे मागितले तेव्हा शंभूनाथने वैतागून हरियाणा दक्षता पथकाकडे याची तक्रार दिली.


पैसे गिळण्याचा प्रयत्न


यानंतर उरलेले पैसे देण्यासाठी महेंद्र पालने शंभूनाथला बोलवले. त्यानंतर शंभूनाथने ही माहिती दक्षता पथकाला दिली. त्यावेळी दक्षता पथकाने महेंद्रला पैसे घेताना अटक केली. पण अधिकाऱ्यांनी महेंद्रला पकडले तेव्हाच त्याने ते पैसे तोंडात कोंबले आणि गिळण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱ्यांसोबत त्याची झटापटही झाली. अधिकाऱ्यांनी महेंद्रला अटक करून त्याची वैद्यकीय चाचणी केली.