विपीन शर्मा, झी मीडिया हरयाणा : सुल्तान म्हटलं की, डोळ्यासमोर उभा राहतो तो बॉलिवूड स्टार सलमान खान. पण हरयाणात अजून एक सुल्तान देशभरात प्रसिद्ध होता. सुल्तान नावाच्या रेड्याचा उत्तर भारतात दबदबा होता. हरयाणातल्या कैथलच्या बुढाकेडा गावच्या या रेड्याचा थाटच वेगळा होता.  पण आता हा सुल्तान या जगात नाही. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानं दुनियेला कायमचं अलविदा केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 मध्ये राजस्थानच्या पशू मेळाव्यात सुल्तानसाठी तब्बल 21 कोटी रुपयांची बोली लागली होती. मात्र मालकानं त्याला विकायला विनम्र नकार दिला. दरवर्षी त्याच्या वीर्य विक्रीतून लाखो रुपयांची कमाई होत होती. राष्ट्रीय पशू स्पर्धांमध्ये त्यानं अनेक बक्षीसंही मिळवली होती. सुल्तान मुर्रा जातीचा जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांबीचा रेडा होता. सुलतानचं वजन 1700 किलो होतं आणि वय सुमारे 12 वर्षे होतं. एकदा तो खाली बसला की तो साधारण 7 ते 8 तास बसायचा.


सुल्तानचं ऐशोआरामाचं जीवन


सुल्तान अतिशय ऐशोआरामात जीवन जगला. दररोज 10 लिटर दूध तो प्यायचा, सुमारे 15 किलो सफरचंद आणि गाजरं खायचा. ड्रायफ्रुट्स, केळी आणि तुपाचा खास खुराक त्याला दिला जात  होता. सुलतान दररोज सुमारे 3000 रुपये किमतीचा चारा खात असे. पण तो मालकाला लाखो रुपये कमवूनही देत होता.


नरेश बेनीवाल या त्याच्या मालकांनी पोटच्या मुलासारखी सुल्तानची काळजी घेतली. सुल्तानच्या जाण्यानं आता त्यांच्यावर आभाळ कोसळलंय. सुल्तानची तसबीर हातात घेऊन ते आता खिन्नपणे शून्यात डोळे लावून बसतात. सुल्तानला ज्या दावणीला बांधलं जायचं, ती जागा देखील आता सुनी सुनी झालीय. 


सुल्तान आता या जगात नसला तरी आठवणींमध्ये तो कायमच अमर झालाय. कारण असा सुल्तान पुन्हा होणे नाही.