नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 'एमआयएम'चे AIMIM सर्वेसवा असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला जाब विचारला आहे. केंद्र सरकार या सगळ्यावर मूग गिळून गप्प का आहे? चीनच्या सैनिकांना भारतीय जमिनीवर कब्जा केलाय का, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे. भारतीय सैन्य आणि चीनच्या लिबरेशन आर्मीत काय बोलणी सुरु आहेत? केंद्र सरकार या सगळ्यात काय करत आहे, हे जनतेला कळाले पाहिजे. मोदी सरकार इतके शांत का आहे, चीनने आपल्या भूभागावर कब्जा केलाय, हे सांगायला त्यांना शरम वाटतेय का?, असे अनेक सवाल ओवेसी यांनी उपस्थित केले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. यानंतर भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. तेव्हापासून दोन्ही देशांकडून लडखाच्या परिसरात सैन्य आणि युद्धसामग्रीची जमवाजमव सुरु आहे. परवाच या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. तब्बल पाच तास ही बैठक सुरु होती. मात्र, यामध्ये कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. 



या बैठकीनंतर सीमारेषेवर चीनची विमाने आणि रणगाड्यांची ये-जा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यानेही युद्धाचा सराव सुरु केला आहे. तरीही मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याने याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताची सीमा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. मात्र, मोदी सरकार केवळ मनाची समजूत काढण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्ये करत असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.