नवी दिल्ली : हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या निदर्शनांना उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी 'आप'तर्फे करण्यात आली. सीएए विरोधातल्या आंदोलनांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात काल जंतरमंतरवर आंदोलने झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जंतर मंतरवर आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटना उतरल्या होत्या. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केली. युपी सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्टुडंट विंगतर्फेही जंतरमंतरवर मोठी घोषणाबाजी करण्यात आली. 


हाथरसमधील बलात्कार पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी देशातल्या डाव्या पक्षांनी काल जंतर मंतरवर आंदोलन केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, पॉलिटब्युरो सदस्य वृंदा करात, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा हे सर्व नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकार या प्रकरणी मौन का बाळगून आहे असा सवाल या नेत्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी टीका त्यांनी केलीय. 



जंतरमंतरवर हाथरस प्रकरणी मोठ्या प्रमाणात काल आंदोलने झाली. शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नेते मंडळी या आंदोलनात उतरले होते. पीडित मुलीसाठी आयोजिक प्रार्थना सभेत प्रियंका गांधी-वाड्रा सहभागी झाल्या. हाथरसमधील पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून देशभरातल्या प्रत्येक महिलेने आवाज उचलला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. या प्रकऱणी न्याय मिळत नाही तोवर काँग्रेस पार्टी योगी आदित्यनाथ सरकारवर दबाव कायम ठेवेल असे त्या म्हणाल्या.