हाथरस प्रकरण : प्रियंका गांधींनी राज्य सरकारला विचारले `हे` पाच प्रश्न
DM यांना पदावरून हटवण्याची मागणी
मुंबई : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा शनिवारी आपले भाऊ राहुल गांधींसह उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबियांच म्हणणं ऐकून घेतलं. जवळपास १ तास त्यांच्यासोबत वेळ घालवला. आज प्रियंका गांधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या सरकारला काही प्रश्न विचारले आहे. तसेच डीएम प्रवीण कुमार यांना पदावरून हटवण्याचं म्हटलं आहे.
हाथरस प्रकरणात DM प्रवीण कुमार यांच्यावर पीडित कुटुंबियांनी अनेक आरोप केले आहेत. पीडित तरूणीच्या भावाचं म्हणणं आहे की, डीएम यांनी कुटुंबियांना घाबरवलं आणि धमकावलं देखील. या कुटुंबियांच्या महिलांसोबत गैरवर्तणूकीतील भाष्य केल्याचा देखील आरोप आहे. एवढंच नव्हे तर DM यांचं असं म्हणणं आहे की,'त्यांची मुलगी कोरोनाने मेली असती तर त्यांना मोबदला देखील मिळाला नसता.'
हाथरस पीडितेच्या कुटुंबाचे प्रश्न :-
सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
हाथरसच्या डीएमला सस्पेंड करण्यात यावे आणि कोणत्याही मोठे पद दिले जाऊ नये
आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोलने का जाळला?
आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला का धमकावले जातेय?
आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल निवडूण आले आहेत, पण आम्ही कसे मान्य करावे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?
प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे सवाल उपस्थित केले आहेत. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणे पीडित मुलीच्या कुटुंबियांचा हक्क असल्याचेही प्रियंका म्हणाल्या आहेत. काल प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोठ्या गदारोळानंतर त्यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली होती.