मुंबई - नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एचडीएफसीने आपल्या गृहकर्जांच्या व्याजदरात वाढ करून ग्राहकांना धक्का दिला आहे. एचडीएफसीने रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (आरपीएलआर) ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. या दरावरच एचडीएफसीच्या गृहकर्जाचे दर अवलंबून असतात. त्यामुळे आता गृहकर्जांचे व्याजदरही वाढणार आहेत. यामुळे विविध वर्गवारीतील व्याजदरांमध्ये ८.९० ते ९.१५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे बॅंकेने स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक जानेवारीपासून नव्या व्याजदरांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आता ३० लाखांपर्यंतचे गृहकर्ज ८.९५ टक्के व्याजदराने उपलब्ध होईल. महिलांसाठी हे व्याजदर ८.९० टक्के इतके असेल. ३० लाखांपेक्षा जास्त आणि ७५ लाखांपेक्षा कमी गृहकर्जासाठी नवा व्याजदर ९.१० टक्के असणार आहे. महिलांसाठी हाच दर ९.०५ टक्के इतका असेल. 


देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बॅंकेने गेल्या महिन्यात १० तारखेला आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षाच्या कालावधीसाठी बॅंकेच्या एमसीएलआरमध्ये ८.५५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. दोन वर्षांसाठी बॅंकेचा एमसीएलआर ८.६५ टक्के करण्यात आला होता. तर तीन वर्षांसाठी हाच दर ८.७५ टक्के करण्यात आला होता. 


एकीकडे देशात अनेक घरे विक्रीविना पडून असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या एक अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे प्रमुख बॅंकांनी गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केल्यामुळे आता पुन्हा एकदा या क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.