कोलकाता: लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार फुटतील, असे भाकित वर्तवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी पलटवार केला. नरेंद्र मोदी हे निर्ल्लज पंतप्रधान असून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी ममतांनी केली. जेणेकरून निवडणुकीच्यावेळी घोडेबाजार होणार नाही, असे ममतांनी सांगितले. त्या मंगळवारी हुगळी जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर येथे सोमवारी नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. यावेळी त्यांनी २३ मे रोजी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ममतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ममता यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत. ते निर्ल्लज पंतप्रधान आहेत. तृणमूल काँग्रेस भाजपप्रमाणे नाही. भाजपमध्ये चोरांचा भरणा असून ते केवळ पैशासाठी काम करतात. तर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यागवृत्तीने काम करतात. त्यामुळे मला कसलीही चिंता वाटत नाही. जर एका नेत्याने पक्ष सोडला तर मी लाखो नवी कार्यकर्ते उभे करेन. परंतु, या वक्तव्यासाठी नरेंद्र मोदी यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे. ते घटनात्मक पदावर राहून संविधानविरोधी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा हक्क नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 


'लोकसभा निवडणुकीनंतर गुजरातमधील सरकार पडेल'


त्यामुळे आता भाजप ममतांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता.