'लोकसभा निवडणुकीनंतर गुजरातमधील सरकार पडेल'

निकाल लागल्यावर गुजरातमधील अनेक आमदार सरकार पाडण्यासाठी राजीनामे देतील

Updated: Apr 29, 2019, 11:41 PM IST
'लोकसभा निवडणुकीनंतर गुजरातमधील सरकार पडेल' title=

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गुजरातमधील भाजपचे सरकार पडेल, असा दावा ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला यांनी केला आहे. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, २३ मे रोजी सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार त्याचीच वाट पाहत आहेत. निकाल लागल्यावर गुजरातमधील अनेक आमदार सरकार पाडण्यासाठी राजीनामे देतील, असा दावा वाघेला यांनी केला.

गुजरातमधील अनेक आमदार पक्षावर बऱ्याच काळापासून नाराज आहेत. त्यांचे कोणीही ऐकून घेत नाही. भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. महाराष्ट्रातील अनेक भाजप आमदारांनीही मला हेच सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर हे सर्व आमदार पक्षाची साथ सोडतील, असे वाघेला यांनी सांगितले. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसला १० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. मात्र, भाजपने वाघेला यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. वाघेला यांच्या विधानात काहीही तथ्य नाही. ते केवळ चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

२०१७ साली गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १८२ जागांपैकी ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या. 

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होणार असल्याचा दावा केला. २३ मे रोजी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा दावा मोदींनी केला आहे.