कामाख्या मंदिर परिसरात आढळलं शिराविना धड, नरबळीचा संशय
पोलिसांना मृतदेहाजवळ पूजेचं साहित्य सापडलंय
गुवाहाटी : आसामची राजधानी गुवाहाटीच्या पश्चिम बाजुला स्थित निलांचल पर्वतारील प्रसिद्ध शक्तीपीठ असलेल्या कामाख्या मंदिर पुन्हा चर्चेत आलं. मंदिर परिसरात नवदुर्गा मंदिराच्या पायऱ्यांवर एक मृतदेह आढळून आलाय. रक्तबंबाळ अवस्थेत असलेला हा मृतदेहाचं शीर धडावेगळं करण्यात आलंय. हा मृतदेह एका महिलेचा आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. उल्लेखनीय म्हणजे, येत्या २२ जूनपासून कामाख्या धाममध्ये प्रसिद्ध अम्बुवासी जत्रेची तयारी सुरू आहे. त्यासाठीच प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था तैनात केलीय. परंतु, मंदिर परिसरातच मृतदेह सापडल्यानंतर या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
गुवाहाटी मेट्रो पोलीस आयुक्त दीपक कुमार यांच्यासोबत पोलिसांची टीम घटनास्थळावर दाखल झाले. मृतदेहाजवळ पूजेची साहित्य सापडल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार आहे की आणखी काही? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. हा मृतदेह कुणाचा आहे? याबद्दल अजूनही समजलेलं नाही.
हिंदुंच्या ५१ शक्तीपीठांपैंकी एक असलेल्या कामरुप कामाख्या मंदिर विशेष रुपानं तंत्र साधनेसाठी ओळखलं जातं. कामाख्या धाममध्ये पूजा-अर्चनेसोबतच म्हैस, बकऱ्यांची बळी देण्याची अनिष्ठ प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. तांत्रिक-मांत्रिकांना तंत्र-मंत्रची सिद्धी हे बळी दिल्यानंतरच होते, असंही इथं मानलं जातं.