अनेक राज्यांमध्ये पावसाने मोठं नुकसान, २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा
वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे मोठं नुकसान
मुंबई : एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे आता बदलत्या हवामानाचं संकट उभं राहिलं आहे. बर्याच राज्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे मोठं नुकसान झालं आहे. गेल्या २३ तासात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने अनेक राज्यात शेतकऱ्यांचं पीक नष्ट झालं आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने देशाच्या बर्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्याने बर्याच राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने या महिन्यात दुसऱ्यांदा अॅलर्ट जारी केला आहे. यापूर्वी, विभागाने 15 एप्रिल रोजी नैरुत्य मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सामान्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तर-पश्चिम भागात तसेच महाराष्ट्रातही थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर भारतातील बर्याच राज्यात पाऊस पडू पडतो. हरियाणाच्या काही भागात 2 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर 3 मेपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये अवकाळी पावसासह गारपीट ही झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकाला मोठा फटका बसला आहे. छतरपूर जिल्ह्यात वादळामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तसेच शेकडो पोपटांचा देखील मृत्यू झाला.
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये गेल्या चोवीस तासांच्या मुसळधार पावसामुळे बरेच नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे आंध्र प्रदेशात शेकडो केळीची झाडे कोसळली आहेत. गुरुवारीही या राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रात ही अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. आज नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.