मुंबई : बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या 24 तासात आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसाचं सावट आता महाराष्ट्रावर देखील आहे. महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचे ढग येत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात समुद्रकिनाऱ्या लगत 20 सेंटीमीटरपर्यंत पावासाची शक्यता आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिलनाडु, महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडात देखील होऊ शकतो. 



मुंबई, रायगड, कोंकण भाग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान 55-65 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे देखील वाहू शकतात. जे नंतर 75 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचू शकतात. समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.



दुसरीकडे तेलंगणाच्या हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. 24 तासात 20 सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला असून पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.