व्हिडिओ : हिमाचलप्रदेशमध्ये बर्फवृष्टी; वीज, पाणीपुरवठ्यावरही परिणाम
अनेक रस्ते आणि राष्ट्रीय राजमार्ग बंद करण्यात आले आहेत.
शिमला : हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. अनेक रस्ते आणि राष्ट्रीय राजमार्ग (national highway)बंद करण्यात आले आहेत. बर्फवृष्टीमुळे राज्यात वीज आणि पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
मंडीमध्ये ५ राष्ट्रीय राजमार्गांसह ३२२ रस्ते बंद करण्यात आले आहे. बर्फवृष्टीमुळे राज्यभरात ३२३ वीजपुरवठा योजना आणि २६ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत.
याआधी शनिवारीही हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली होती. बर्फवृष्टीमुळे संपूर्ण प्रदेशात शीतलहरी सुरु आहेत. शनिवारी लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील केलांगमध्ये शून्य ते ९.२ अंश सेल्सियसखाली तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत लाहौल-स्पीतीतील केलांगमध्ये -१५.० डिग्री सेल्सियस, किनौरमधील कल्पामध्ये -८.४ डिग्री सेल्सियस, डलहौजीमध्ये -२.४, मनालीमध्ये -४.४, तर कुर्फीमध्ये -५.० डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
किन्नोर जिल्ह्यातील कल्पा येथे शनिवारी २४.४ सेमी बर्फाचा थर पाहण्यात आला. इतका बर्फाचा थर हा राज्यातील कोणत्याही प्रदेशाच्या बर्फाच्या थरापेक्षा सर्वाधिक होता. शुक्रवारपासून आतापर्यंत २४ तासांदरम्यान शिमला आणि सिरमौर जिल्ह्यांत सतत पाऊस पडतो आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० आणि २१ जानेवारी रोजी पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात काही भागात दाट धुक्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात हिमस्खलन झाले आहे.