नवी दिल्ली : दिल्लीत रामलीला मैदानावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने इमारतींच्या वरच्या भागात स्नायपर्स तैनात केल्याची माहिती मिळत आहे. जवळपास २० पोलीस आयुक्त, स्थानिक पोलिस, ड्रोन-विरोधी पथके आणि एनएसजी कमांडोचे तब्बल एक हजार जवान तैनात असून कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सभेसाठी दहशतवाद्यांचा धोका असल्याची माहिती मिळत आहे. गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना याबाबत सतर्क केलं आहे. या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली असून सुरक्षा कर्मचारी तैनात गेले आहेत. पंतप्रधान येत असलेल्या मार्गावर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्यादृष्टीने, अफवा पसरवल्या जाऊ नयते यासाठी सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. 


दिल्लीतील सीमावर्ती भागात समाजकंटकांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहनांच्या तपासणीत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व मार्गांवरील सीसीटीव्हीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. 



दिल्लीतल्या १ हजार ७३४ अनधिकृत वसाहती एका विधेयकाद्वारे नियमित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास ४० लाख लोकांना त्यांच्या संपत्तीचा हक्क मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी भाजपने या रॅलीचं आयोजन केलं आहे.