`पंडित नेहरूदेखील म्हणायचे देश `जनसंघ मुक्त` करू`
काँग्रेस नेत्यांच्या टीकेला गुरूवारी हिमाचल प्रदेशातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
शिमला : काँग्रेस नेत्यांच्या टीकेला गुरूवारी हिमाचल प्रदेशातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विधानाचा दाखला दिला आणि म्हणाले, 'पंडित नेहरू हे देखील सुरूवातीच्या काळात भारताला जनसंघ मुक्त करू, असे म्हणायचे, मात्र आता, काँग्रेस पक्षात महात्मा गांधी तसेच स्वातंत्र्य सैनिकांना अभिप्रेत असलेली एकही गोष्ट उरलेली नाही'.
नरेंद्र मोदी यावर आणखी पुढे बोलताना म्हणाले, 'आताच्या काँग्रेसमध्ये केवळ भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण, जातीयवाद आहे. हा पक्ष कीड लागलेल्या विचारसरणीचे उदाहरण आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देतो, तेव्हा आम्हाला या कीड लागलेल्या विचारणीपासून देशाला मुक्ती मिळावी, असे अभिप्रेत आहे'.
या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावरही निशाणा साधला, मोदी म्हणाले, 'काँग्रेसची अवस्था ही एखाद्या 'लाफिंग क्लब'सारखी झाली आहे'.
'आगामी निवडणुकीत भाजप विजयी होईल', असा आशावाद व्यक्त करताना मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली आणि म्हणाले, 'राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत, असे असतानाही पक्षाच्या जाहीरनाम्यात शून्य भ्रष्टाचाराचे आश्वासन दिले जाते.'