Himachal Pradesh Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता मिळण्याच्या जवळ असताना हिमाचलमध्ये मात्र अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. हिमाचलमध्ये (Congress) कॉंग्रेस 38 तर भाजप (BJP) 26 जागांवर आघाडीवर आहे. निवडणुकांचे कल पाहता दोन्ही पक्षांमध्ये 10 जागांचा फरक असण्याची शक्यता आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 44 जागा जिंकल्या होत्या. तर कॉंग्रेसला 21 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल सरकारमध्ये एक प्रथा वर्षानुवर्षांपासून पाहायला मिळत आहे. इथं दर पाच वर्षांनी सरकार बदलत आहे. मात्र यावेळीही भाजपचे सत्ता कायम राखण्याचे भाजपचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी चित्र उलटं असल्याने संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच भाजपने तयारी सुरु केली आहे.


विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी


भाजपने विनोद तावडे (Vinod Tawde) यांना हिमाचल प्रदेशात पाठवले आहे. पक्षाने तीन अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हिमाचल प्रदेश मध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. विनोद तावडे हा प्लॅन बी तयार करणार आहेत. जागा कमी पडल्या तर अपक्षांची मदत घेतली जाणार असल्याचे म्हटले आहेत. तीनही अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याने भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.


कोण आहेत अपक्ष उमेदवार?


के एल ठाकूर


नालागढ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार के एल ठाकूर हे आघाडीवर आहेत. के एल ठाकूर हे भाजपचेच माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाकडे वळवणे सोपे जाण्याची शक्यता आहे. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यावर के एल ठाकूर नाराज असल्याची चर्चा आहे.


होशियार सिंह


 देहरा येथून अपक्ष निवडणूक लढवत असलेले होशियार सिंह 2017 च्या निवडणुकीतही अपक्ष उभे होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. देहरा मतदारसंघातून ते सध्या आघाडीवर आहेत. होशियार सिंह पक्ष नेतृत्वावर नाराज असले तरी भाजप त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.


आशिष कुमार शर्मा


आशिष कुमार शर्मा हे सध्या हमीरपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. कॉंग्रेसचं तिकिट परत करून ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. हमीरपूरमधून आशिष शर्मा काँग्रेसच्या पुष्पिंदर सिंग यांच्यावर मोठी आघाडी मिळवली होती. 


या तीन उमेदवारांपैकी दोन आमदार हुशार सिंह आणि के एल ठाकूर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांचे निकटवर्तीय आहेत. या दोनही आमदारांची इच्छा प्रेम कुमार धुमल हे मुख्यमंत्री व्हावे अशी आहे. त्यामुळे भाजपला हिमाचलमध्ये जर जागा कमी पडल्या तर मुख्यमंत्री देखील बदलल्याची शक्यता आहे.