जालंदर : निवडणूक म्हटलं की अश्वासने, टीका आणि आरोप प्रत्यारोप हे आलेच. पण आजवर हे एका मर्यादेपर्यंत चालत असे. अलिकडील काळात मात्र, निवडणुकांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये जनावरे आणि जंगली प्राण्यांचाही समावेश झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तर, चक्क माकड आणि त्यांच्या मर्कटलीलाच निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं झालंय असं की, हिमाचल प्रदेशमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. देशभरातील सर्वच राज्यांमधील निवडणुकांमध्ये रस्ते, पाणी, विकास, पर्यावरण, उद्योग, व्यवसाय, नोकरी आदी मुद्दे चर्चेत येतात. या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडतात. अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना नेते एकमेकांना प्राण्यांची उपमा देतात. त्यातून वादही होतात. पण, हिमाचल प्रदेशमध्ये माकडांचा मुद्दा खरोखरच निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. आणि त्याच्यावर जोरदार चर्चाही होताहेत.


निवडणुकीत माकडांचा मुद्दा का आला चर्चेत?


हिमाचल प्रदेशात माकडांचा मुद्दा हा कोणत्या नेत्याने चर्चेत आणला नाही. तर, लोक खरोखरच माकडांच्या त्रासामुळे चर्चेत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये माकडांनी इतका उच्छाद मांडला आहे की, नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. अनेकदा माकडे नागरी वस्तीत घुसून माणसांवर हल्ले करतात. कधी शेतात घुसून भर पिकाची नासाडी करतात. त्यामुळे नागरीक इतके हैराण झाले आहेत की, माकडांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आता सरकार आणि प्रशासनानेच काहीतरी करावे, अशी जनतेची भावना आहे.


सरकार अपयशी


हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास सर्वच पक्षांची सरकारे माकडांच्या त्रासाला आळा घालण्यात अपयशी ठरली आहेत. विधानसभेत प्रस्ताव पास झाल्यानंतर केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशमध्ये माकडांना हानिकारक आणि हिंसक पशूचा दर्जा मिळाला आहे. असे असताना देखील हिमाचल प्रदेशमधील विद्यमान सरकारने माकडांच्या मुद्द्याकडे हवे तसे लक्ष  दिले नसल्याची टीका होत आहे.