Manali Traffic Jam News : हिवाळ्याची चाहूल लागते न लागते तोच अनेकांचे पाय काही ठराविक पर्यटनस्थळांकडे वळतात. हिमाचल प्रदेश हे त्यातचलंच एक नाव. हिवाळ्यात आणि त्यातूनही बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानंतरचं हिमाचल प्रदेश पाहण्याची अनेकांनाच उत्सुकता असते आणि परिणामी दरवर्षअखेरीस कैक पर्यटक या ठिकाणाची वाट धरतात. यंदाचं वर्षही इथं अपवाद ठरलेलं नाही. मात्र हिमाचल प्रदेशात गेलेल्या पर्यटकांना सहलीचा सुखद अनुभव येण्याआधी मनस्तापच जास्त सहन करावा लागत आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे इथं असणारी वाहतूक कोंडी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशातील मनाली आणि डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं इथं आलेल्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सध्या हिमाचल प्रदेशात अनेक वाहनं बर्फामध्ये ठप्प झाल्यामुळं कैक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सध्या प्रशासनानं ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पण, प्रवाशांचा मनस्ताप मात्र काही केल्या दूर होताना दिसत नाहीय. 


सोमवारी रात्री उशिरापासून हिमाचलमधील अटल बोगद्यापासून सोलांगच्या दिशेने शंभरहून अधिक वाहनांमध्ये शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. बर्फवृष्टीनंतर निसरड्या रस्त्यांमुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहनांमध्ये अडकले आहेत. रात्रभर बचावकार्य सुरू असून 800 हून अधिक वाहनांमधील पर्यटकांना मनालीत सुखरूप आणण्यात आलं आहे.


तिथं हिमाचलची राजधानी असणाऱ्या शिमला येथे नव्यानं झालेल्या हिमवृष्टीमुळं थंडीचा आनंद द्विगुणित केला आहे. शिमल्यातील निसर्गसौंदर्य यामुळं खुलून आलं असून, इथं मॉल रोड आणि इतर अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 



कधीपर्यंत सुरू राहणार बर्फवृष्टी? 


हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेशात सुरू असणारी बर्फवृष्टी नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातही सुरूच राहणार असून, ज्यामुळं शिमला, कुल्लू मनाली इथं येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणचं अविस्मरणीय रुप पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यानच्या काळात स्पितीच्या खोऱ्यात हिमवृष्टीचं प्रमाण वाढणार असून, इथं मात्र नगरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.