Himachal Rain : हिमाचल प्रदेशासह (Jammu Kashmir, Ladakh) जम्मू काश्मीर, उत्तराखंड येथे सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. हिमाचलमध्ये सुरु असणाऱ्या पावसानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून, आतापर्यंत इथं 19 नागरिकांचा मृत्यू ओढावल्याचं वृत्त पीटीआय य़ा वृत्तसंस्थेनं दिलं आहे. देशाच्या उत्तर भागात सध्या दिल्लीपासून थेट हिमाचल आणि काश्मीरपर्यंत हा पाऊस अडचणी निर्माण करताना दिसत आहे. गंगा, बियाससह यमुना नदीसुद्धा सध्या दुथडी भरून वाहत आहे. 


कसे असतील येणारे दिवस? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला असून, इथं नद्यांची पात्र आता किनाऱ्यालगचा बराच भाग गिळंकृत, करताना दिसत आहेत. ज्यामुळं राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासांमध्ये हिमाचलच्या चंबा, (Kullu) कुल्लू, कांगडा, बिलासपूर आणि हमीरपूर या भागांमध्ये अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain News : आज राज्याच्या 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; निसर्ग धडकी भरवणार 


एएनआय या वृत्तसंस्थेनं मनिकरण साहिब (Manikaran Sahib) येथील एक व्हिडीओ शेअर केला. जिथं पार्वती नदीच्या पात्राचं रौद्र रुप पाहून अनेकांनाच धडकी भरली. नदीच्या पात्रातून वाहणारं पाणी अतिप्रचंग वेगानं उसळत असून, गुरुद्वारापाशी जाणाऱ्या पूलालाही ते धडक देताना दिसत आहे. राज्यात बरसणारा पाऊस पाहता येथील शाळां- कॉलेजांना पुढील 2 दिवसांसाठी सुट्टी देण्यात आली असून, स्पिती, मंडी, लाहौल या ठिकाणी पर्यटकांनी सध्या येऊ नये अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं आवाहन करण्यात येत आहे. 


सध्या हिमाचलच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या पर्यटकांपर्यंत प्रशासन मदतीचा ओघ पोहोचवत असून, त्यांना सुरक्षित स्थळांवर स्थलांतरिक करण्याचं कामही बचाव पथकांनी हाती घेतलं आहे. हिमाचल प्रदेश सरकारकडून 1077 हा आपात्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्यामुळं तुमच्या ओळखीतील कुणी इथं असल्यास त्यांच्यापर्यंत हा क्रमांक नदी पोहोचवा. 





चंदीगढ- मनाली रस्ता वाहतूक बंद 


गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये सुरु असणारा पाऊस पाहता येथील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत. पावसामुळं उसळणाऱ्या बियास नदीच्या किनारपट्टी भागात प्रचंड प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. याचे परिणाम राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर झाले असून, चंदीगढ- मनाली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बऱ्याच तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. सध्या राज्यात जवळपास 150 रस्ते बंद असून, वाहतुकीचे पर्यायी मार्ग वापरण्याचं आणि शक्य असल्यास प्रवास टाळून सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन सर्वांना करण्यात येत आहे. 


लडाखमध्ये बर्फवृष्टी 


हिमाचलच्या मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी असतानाच पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. (Leh Ladakh) लेह- ल़डाखमध्येही परिस्थिती वेगळी नाही. लेहमध्ये रविवारी पावसाची नोंद करण्यात आली. तर, लडाखमध्ये बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. थोडक्यात देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या या पर्वतीय राज्यांमध्ये सध्या पर्यटनासाठीचा बेत न केलेलाच बरा.