काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं. यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिंमंता बिस्वा सर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंमंता बिस्वा सर्मा यांनी 'रामराज्य' असं लिहित टोला लगावला आहे. 


राहुल गांधींना प्रवेश नाकारला


राहुल गांधी यांना बोर्दोवा थान येथे जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर धरणं आंदोलन केलं जात आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिरापासून 20 किमी अंतरावर स्थानिक आमदार, खासदारांना रोखण्यात आलं. व्हिडीओत राहुल गांधी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपल्याला रोखण्याचं कारण विचारताना दिसत आहेत. 


यासंबंधी बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले आहेत की, "राहुल गांधींना तिथे जायचं होतं. आम्ही 11 जानेवारीपासून प्रयत्न करत आहोत. आमच्या दोन आमदारांनी यासंबंधी व्यवस्थापनाची भेटही घेतली होती".


"आम्ही 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता येणार असल्याचं कळवलं होतं. आमचं स्वागत होईल असं सांगण्यात आलं होतं. पण नंतर आम्हाला 3 वाजेपर्यंत येऊ नका असं कळवण्यात आलं," असं जयराम रमेश यांनी सांगितलं.


पुढे ते म्हणाले की, "राज्य सरकारकडून यासाठी दबाव टाकण्यात आला आहे. पण आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करु. आम्हाला अतिरिक्त अंतर पार करायचं असल्याने 3 वाजल्यानंतर जाणं थोडं कठीण आहे".


रविवारी हिमंता बिस्वा सर्मा यांनी राहुल गांधींना 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पर पडत असताना त्याच दिवशी मंदिरात दर्शनासाठी जाऊ नये असं आवाहन केलं होतं. सोमवारी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत अल्पसंख्याक बहुल भागात संवेदनशील मार्गांवर कमांडो तैनात केले जातील, असंही ते म्हणाले.