मुंबई: हिंदी, हिंदू आणि हिंदुत्त्व या विचारसरणीमुळे देशात फूट पडत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अब्राहम सॅम्युअल या विद्यार्थ्याला हिंदी भाषा येत नसल्याने रोखून धरण्यात आले होते. या घटनेचा धागा पकडत शशी थरुर यांनी ट्विटरवर आपले मत मांडले. त्यांनी म्हटले की, हिंदी, हिंदू आणि हिंदुत्त्व ही विचारसरणी देशात फूट पाडत आहे. आपल्याला देशात एकता हवी आहे, एकरुपता नव्हे, असे थरुर यांनी म्हटले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्राहम सॅम्युअल हा तामिळनाडूचा रहिवासी आहे. तो सध्या अमेरिकेच्या क्लार्कसन विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला इमीग्रेशन द्यायला नकार दिला होता. मला केवळ  इंग्रजी आणि तामिळी भाषा येत असल्याचे कारण त्यांनी दिले. या प्रकारानंतर अब्राहम सॅम्युअलने ट्विट करून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस नेते शशी थरुर आणि द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन यांच्याकडे दाद मागितली होती. या पार्श्वभूमीवर शशी थरुर यांनी ट्विट करून आपले मत मांडले. 



काही दिवसांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुंभमेळ्यातील शाही स्नानावर उपरोधिक टीका केली होती. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळासह गंगेत स्नान केले होते. त्यांनी म्हटले होते की, तुम्हाला गंगा स्वच्छही ठेवायची आहे आणि येथेच पापही धुवायची आहेत.