रामराजे शिंदे, झी २४ तास, दिल्ली : जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जेएनयूमधल्या हल्ल्यावरुन एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालते. त्याचवेळी या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने घेतली आहे. राष्ट्रविरोधी घटनेचं केंद्र जेएनयू बनले आहे. त्यामुळे हा हल्ला आपणच घडवून आणल्याचे हिंदू रक्षा दलाच्या पिंकी चौधरीने म्हटले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेएनयूमधल्या रविवारच्या हिंसाचारानंतर अजूनही दिल्ली पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही. सध्या सुमारे ७०० हून अधिक पोलिस जेएनयू परिसरात तैनात करण्यात आलेत. दरम्यान याप्रकरणी  जेएनयू विद्यार्थी संघटनाच्या अध्यक्षा आएशी घोष हिच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचनं हे प्रकरण हाती घेतले आहे. जेएनयू परिसरात क्राईम ब्रॅंचची टीम दाखल झाली आहे. क्राईम ब्रॅंचची टीम ३६ जणांचे जबाब नोंदवणार आहे. सुरक्षा रक्षक, विद्यार्थी, प्रत्यक्षदर्शी आणि जखमींचे जबाब नोंदवले जातील. हल्लेखोर कसे घुसले ?, हातात काठ्या आणि लोखंडी रॉड कसे आले ?, याचाही तपास पोलीस करणार आहेत. यासोबतच मोबाईल व्हिडीओची पडताळणी देखील केली जाणार आहे. 


या हल्ल्याचा निषेध करत प्राध्यापक सी पी चंद्रशेखर यांनी आर्थिक आकडेवारीची समीक्षा करणाऱ्या सरकारी पॅनेलचा राजीनामा दिलाय. सध्या जेएनयूमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.